विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आज सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. यानंतर उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर निवडणूक प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. मतदानापूर्वीचे ४८ तास अतिशय महत्त्वाचे असल्याने राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, आणि नागरिकांच्या हालचालींवर निवडणूक पथकांची सतर्कता अधिक वाढविण्यात आली आहे.
१८३ उमेदवार निवडणूक रिंगणात
राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून एकूण १८३ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात केंद्र व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा, रॅल्या, आणि आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापवले आहे.
गुप्त बैठकांचे सत्र होणार सुरू
आज सायंकाळी प्रचार थांबला तरी उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठींना वेग येणार आहे. तसेच, गुप्त बैठकांचे सत्र सुरू राहण्याची शक्यता आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने मतदानापूर्वीचे दोन दिवस निर्णायक मानले जात आहेत.
प्रलोभनांवर प्रशासनाची करडी नजर
मतदानाच्या आधी मतदारांना प्रलोभन देण्याचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक विभाग आणि पोलिस यंत्रणेच्या स्थिर व फिरत्या पथकांना अधिक सक्रिय केले आहे. नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात शांततामय आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.