राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी सुरु असलेल्या रस्सीखेचीत तिसऱ्या आघाडीने आज आपली उपस्थिती जाहीर केली आहे. पुण्यात आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत परिवर्तन महाशक्ती या नव्या राजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली.
राज्याच्या राजकारणात तिसरा पर्याय देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चाचपणी सुरु होती, आणि आजच्या बैठकीत याला मूर्त स्वरूप देण्यात आले. या आघाडीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे 26 सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी ज्यांना या आघाडीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले.
सामूहिक नेतृत्वावर भर
राजू शेट्टी यांनी या आघाडीमध्ये सामूहिक नेतृत्व असेल असे स्पष्ट केले. सर्व निर्णय समन्वय समितीद्वारे घेतले जातील. सामान्य माणसाला एक सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी ही आघाडी उभी राहणार असून, स्वच्छ चरित्र आणि स्वच्छ चेहरा देण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरु
संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, परिवर्तन महाशक्ती हा महाराष्ट्राच्या अस्वस्थ जनतेला एक सुसंस्कृत आणि वेगळा पर्याय देण्याचा प्रयत्न आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या नावावर कोणाचा सातबारा नाही, असे सांगत त्यांनी जनतेला नवीन पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांना या आघाडीत सहभागी करण्यासाठी चर्चा सुरु असून, त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचे संभाजीराजे यांनी नमूद केले.
26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा
या तिसऱ्या आघाडीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे 26 सप्टेंबर रोजी होणार असून, राज्यातील जनतेला या परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नेत्यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*