छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव (९३ किमी) आणि धाराशिव-बीड-संभाजीनगर (२४० किमी) या नवीन लोहमार्गांसाठी मोठा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव मार्गाच्या अंतिम भूमापन सर्वेक्षणासाठी २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपये, तर धाराशिव-बीड-संभाजीनगर मार्गाच्या सर्वेक्षणासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
भूमापनानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू
संबंधित मार्गांचे अंतिम भूमापन सर्वेक्षण झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पातून निधी मंजूर करून प्रत्यक्ष लोहमार्गाच्या कामास गती दिली जाणार आहे.
वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेला प्रकल्प
छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव या मार्गाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. यापूर्वी मध्य रेल्वेने या मार्गाचे सर्वेक्षण केले होते. तसेच, औट्रम घाटात बोगद्याद्वारे धुळे-सोलापूर महामार्ग आणि लोहमार्ग टाकण्याचा विचार करण्यात आला होता.
धाराशिव-बीड मार्गासाठी सहा कोटींची तरतूद
धाराशिव-बीड-संभाजीनगर या २४० किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाच्या सर्वेक्षणासाठी यंदा सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांनी दोन्ही मार्गांसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता.
या लोहमार्गांमुळे होणारे फायदे
✅ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीस चालना मिळेल.
✅ संभाजीनगरमधून तुळजापूर, पंढरपूर या महत्त्वाच्या देवस्थानांसाठी थेट रेल्वेसेवा मिळेल.
✅ नवी दिल्लीला जाण्यासाठी मनमाडचा वळसा घालण्याची गरज भासणार नाही.
✅ चाळीसगाव मार्गामुळे १३२ किमीचा प्रवास वाचेल.
✅ उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा आणखी एक महत्त्वाचा लोहमार्ग तयार होईल.
यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*