जुने भांडण आणि पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून सुमित काशिनाथ जावळे (वय १७) या तरुणाची सहा जणांनी मिळून क्रूर हत्या केली. हा थरार सोमवारी रात्री १२ वाजता बेगमपुऱ्यातील आम्रपालीनगरच्या मोनूज हॉटेलच्या मागे घडला.
या प्रकरणात सुमितच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऋतिक उर्फ छोटू चव्हाण, जिता टाक, ऋषी चव्हाण, एक अल्पवयीन मुलगा आणि ऋतिकची आई पूनम विजय चव्हाण या पाच आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुना वाद ठरला घातक
दिड महिन्यांपूर्वी घाटी परिसरात क्रिकेट खेळताना सुमित आणि आरोपींमध्ये वाद झाला होता, ज्यात सुमित जखमी झाला होता. सुमितने या प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली होती. या तक्रारीचा राग मनात ठेवून आरोपींनी सोमवारी रात्री सुमितला घराबाहेर बोलावून मोनूज हॉटेलजवळ हल्ला केला. आरोपींनी “तेरा बोहत हो गया, पोलिस स्टेशन में कम्प्लेंट क्यूं देता है” असे म्हणत दांडे, चाकू आणि कोयत्याने सुमितवर वार केले. गळ्यावर खोलवर झालेल्या वारामुळे सुमित रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
आईवरही चिथावणीचा आरोप
या हत्येत आरोपींची आई पूनम चव्हाणने चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर रोजी पूनमने अन्य आरोपींसह सुमितच्या घरी जाऊन त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असेही सुमितच्या वडिलांनी सांगितले आहे.
पोलिसांची शोधमोहीम सुरू
या प्रकरणातील आरोपींचा शोध बेगमपुरा पोलिस आणि गुन्हे शाखा घेत आहेत, अशी माहिती निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक शेषराव खटाणे करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*