छत्रपती संभाजीनगर : शहरातील गणेश कॉलनी येथील १६ वर्षीय मुलीने ड्रेस व्यवस्थित करताना चुकून स्कार्फ पिन (सेफ्टी पिन) गिळल्याने गंभीर प्रसंग ओढावला होता. ही पिन थेट श्वसनमार्गात अडकली होती. मात्र घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करून मुलीचे प्राण वाचवले.
रविवारी (ता. १) रात्री सुमारे १० वाजता संबंधित मुलगी ड्रेस व्यवस्थित करत असताना तिने स्कार्फ पिन दातात धरली होती. बोलताना किंवा हालचालीदरम्यान ती पिन चुकून श्वसनमार्गात गेली. त्यानंतर तिला तीव्र खोकला आणि छातीत वेदना सुरू झाल्या. परिस्थितीची गंभीरता ओळखून कुटुंबीयांनी तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून तिला तत्काळ उपाशी ठेवले आणि आवश्यक तपासण्या सुरू केल्या.
छातीच्या एक्स-रेमध्ये डाव्या मुख्य श्वासनलिकेत रेडिओ-अपेक परकीय वस्तू अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले. ही अवस्था अत्यंत धोकादायक असल्याने तातडीने ब्रॉन्कोस्कोपीद्वारे शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख आणि त्यांच्या पथकाने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान अॅनेस्थेसिया विभागानेही दक्षतेने भुल व्यवस्थापन केले.
सुमारे तीन इंच लांबीची लोखंडी रॉड असलेली पिन श्वासनलिकेत खोलवर अडकली होती. ती फुफ्फुसात जाऊन गंभीर इजा होण्याची शक्यता होती; मात्र डॉक्टरांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती स्थिर असून तिचा श्वसन त्रास पूर्णपणे कमी झाला आहे.
दरम्यान, लहान मुले व किशोरवयीन मुलांकडून चुकून दगड, पिन यांसारख्या वस्तू गिळण्याच्या घटनांत वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*