खुलताबाद / वेरूळ : येत्या ३ मार्च रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होत असल्याने वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे काही काळ भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मंदिर संस्थानच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या सुमारे नऊ तास आधी ‘वेध’ सुरू होतो. या कालावधीत देवपूजन, मूर्तीस्पर्श आणि नैवेद्य अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. ग्रहणकाळात वातावरणात नकारात्मक लहरींचा प्रभाव असल्याचा भाविकांचा समज असल्याने देवतेची पवित्रता अबाधित राखण्यासाठी ‘कवाड बंद’ करण्याची परंपरा पाळली जाते. गर्भगृह हे ऊर्जेचे केंद्र मानले जात असल्याने ग्रहणाच्या काळात ही ऊर्जा दूषित होऊ नये, यासाठी मूर्तीवर दर्भ व तुळस ठेवून ती झाकण्याची प्रथा आहे.

सूतक काळ सुरू झाल्यामुळे दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.३० या वेळेत मंदिराचे दरवाजे पूर्णतः बंद राहतील. या कालावधीत होणारी दुपारची तसेच सायंकाळची आरती होणार नसल्याचेही संस्थानने स्पष्ट केले आहे.

ग्रहण सुटल्यानंतर ‘मोक्ष काळात’ मंदिर परिसराचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये संपूर्ण स्वच्छता, महाअभिषेक आणि विशेष पूजाविधी पार पडतील. त्यानंतर रात्री उशिरा किंवा पुढील दिवशी पहाटेपासून नियमित दर्शन पुन्हा सुरू केले जाईल.

पुरोहित मंडळाने भाविकांना आवाहन केले आहे की, मंदिर बंद असले तरी ग्रहणकाळात घरी राहून जप, तप व नामस्मरण करावे. तसेच ग्रहणानंतर दानधर्म करण्यास विशेष महत्त्व असून गरजू व्यक्तींना अन्नधान्य, वस्त्र आदींचे दान करणे शुभ मानले जाते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

512 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क