छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज बाजार परिसरातून १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (२२ जुलै) रात्री उघडकीस आला. नागरिकांच्या तत्परतेमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला असून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नालीत रिक्षा अडकल्याने आरोपी मुलीला व रिक्षा घटनास्थळी सोडून पसार झाला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मुलीला निर्जन ठिकाणी घेऊन जात असल्याने त्याचा हेतू गंभीर स्वरूपाचा असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आत्याकडे शहागंज येथे गेली होती. आत्याने खाऊ आणण्यासाठी तिला दुकानात पाठवले असताना रिक्षा क्रमांक एमएच २० ईएफ ४४२८ येऊन थांबली. चालकाने “मी तुझ्या आंटीला ओळखतो, चल कुरकुरे घेऊन येऊ,” असे सांगत तिच्या हातात १०० रुपये दिले. मुलगी रिक्षात बसण्यास तयार नसल्याने आरोपीने तिचे तोंड दाबून जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि तेथून पसार झाला.
हा प्रकार लक्षात येताच आरीफ सईद खान, शेख युसुफ शेख यासीन आणि मोसिन खान मोईन खान या तिघांनी प्रसंगावधान दाखवत रिक्षाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच आरोपीने भरधाव रिक्षा जिल्हाधिकारी कार्यालय परिसराकडे वळवली. मात्र रजिस्ट्री कार्यालयाजवळील नालीत रिक्षा अडकल्याने त्याने मुलगी आणि रिक्षा तेथेच सोडून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज शिंदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत रिक्षा ताब्यात घेतली. मुलीची सुरक्षित सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*