वाळूज महानगर : आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी २४ जुलै रोजी रात्री ८ वाजेपासून २५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत काही प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत ए.एस. क्लब ते कामगार चौक हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार असून ओअॅसिस चौक ते आंबेडकर चौक (एफडीसी कॉर्नर) या मार्गावरही वाहतुकीस बंदी असेल. तसेच इसारवाडी फाटा ते कामगार चौक आणि नगरनाका ते ए.एस. क्लब चौक या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे वाहनचालकांनी महानुभाव चौक, कांचनवाडी, चित्तेगाव, बिडकीन, इसारवाडी फाटा, वाल्मी नाका, एनआरबी चौक, रांजणगाव, साजापूर, पाटोदा टी आणि संताजी चौकी या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतिपंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर राज्य महामार्गालगत असून आषाढी एकादशीनिमित्त शहरासह परिसरातील विविध गावांमधून सुमारे १५० ते २०० दिंड्या मंदिराकडे दाखल होणार आहेत. यात्रेनिमित्त रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तात्पुरती दुकाने उभारली जाणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

जालना, बीड, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दिशांकडून ये-जा करणाऱ्या हलक्या व अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या बस तसेच खासगी ट्रॅव्हल्स वाहनांनाही महानुभाव आश्रम चौक – कांचनवाडी – चित्तेगाव – बिडकीन – इसारवाडी फाटा या मार्गानेच वाहतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाविकांनी आणि वाहनचालकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, तसेच प्रवासापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घेऊनच नियोजन करावे, असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,645 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क