छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सीएसएमआरडीए) हद्दीतील 31 डिसेंबर 2020 पूर्वीच्या विनापरवाना बांधकामांना नियमित करण्यासाठी सुरू असलेल्या मालमत्ता अभय योजनेअंतर्गत 31 जुलै 2026 पर्यंत बेटरमेंट शुल्कात तब्बल 90 टक्के सवलत देण्यात आली असून, या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला. तसेच 31 डिसेंबर 2020 नंतरची नियमानुसार नसलेली अनधिकृत बांधकामे हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सीएसएमआरडीए कार्यालयात प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, महानगर उपआयुक्त (प्रशासन) लखीचंद चव्हाण, लेखाधिकारी विकास काकडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, 1 मे ते 31 जुलै 2026 या कालावधीत केवळ 10 टक्के बेटरमेंट शुल्क भरून मालमत्ता नियमित करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत 50 टक्के शुल्क आकारले जाईल, तर 1 नोव्हेंबरपासून पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे पात्र नागरिक, उद्योजक, विकासक आणि व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने अर्ज सादर करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी इनामी जमिनींवर बेकायदेशीर प्लॉटिंग करून भूखंड विक्री करणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले. तसेच 1 ऑगस्टपासून सीएसएमआरडीएमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे, निवृत्त सैनिकांचे विशेष टास्क फोर्स स्थापन करून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

प्राधिकरण क्षेत्रातील नियोजनबद्ध विकासासाठी अंतिम ले-आउट मंजुरीवेळी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्या, वीज व्यवस्था, खुल्या जागा आणि वृक्षारोपण यांसारख्या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय टोयोटा किर्लोस्कर, Ather आणि JSW Green Mobility यांसारख्या उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा स्थानिक युवक व महिलांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

726 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क