नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी अखेर २७ व्या दिवशी आपले आमरण उपोषण सोडले. गुरुवारी मध्यरात्री केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर नड्डा यांच्या हस्ते सरबत पिऊन वांगचूक यांनी उपोषण समाप्त केले.
वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, विविध राजकीय पक्षांतील ६५ खासदारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. दीर्घ चर्चा, काही अटींवर झालेली सहमती आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आंदोलकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
लेह एपेक्स बॉडीचे सह-संयोजक शेरिंग दोरजे लकरुक यांनी सांगितले की, सरकारने दोन महत्त्वाच्या बाबींवर लेखी आश्वासन दिल्यानंतर वांगचूक यांनी उपोषण सोडले. विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत असतील तर त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा विचार केला जाईल, तसेच आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याबाबतही सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगत, या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी वांगचूक यांनी उपोषण सोडल्याचे स्वागत केले असले, तरी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेले आंदोलन सुरूच राहणार असून, आंदोलनाचा आज ३५ वा दिवस आहे. रात्री उशिरा काही आंदोलकांनी संसद मार्गावरील बॅरिकेड्स तोडल्याची घटनाही घडली असून, CJP ने आज देशभरात आंदोलनाची हाक दिली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*