छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : राज्यभर सुरू असलेल्या ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगरातील इंदिरानगर, जुना बायजीपुरा येथील YES Fine Bakery वर धडक कारवाई करत बेकरीचा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

एफडीएच्या पथकाने केलेल्या तपासणीत बेकरीचा उत्पादन विभाग अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. उत्पादन परिसरात धूळ, कोळिष्टके, गंज तसेच साचलेली घाण आढळली. याशिवाय काही कामगार उत्पादन क्षेत्रात तंबाखूचे सेवन करत असल्याचेही तपासात समोर आले, ज्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेसह ग्राहकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

तपासणीदरम्यान पॅकिंग विभागातही अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचे, अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (FSMS) प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे, पेस्ट कंट्रोलची व्यवस्था नसल्याचे तसेच खरेदी-विक्रीच्या आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय बेकरीच्या उत्पादनांवर चुकीच्या उत्पादकाचा पत्ता वापरून लेबलिंग करण्यात आल्याचे उघड झाले. अनेक उत्पादनांच्या पॅकेजिंगवर बॅच क्रमांक, उत्पादन व कालबाह्यता (एक्सपायरी) तारीख यांसारखी अत्यावश्यक माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे एफडीएने स्पष्ट केले.

या सर्व गंभीर नियमभंगाची दखल घेत सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने YES Fine Bakery चा अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर पुढील काळातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,123 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क