छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वाळूज महानगरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पहाटेपासून भक्तांची मोठी गर्दी होत आहे. राज्यासह परराज्यातून आलेल्या वारकऱ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात विठुरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
यंदा सुमारे १५० ते २०० दिंड्या आणि लाखो भाविक यात्रेत सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर संस्थान, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, महावितरण तसेच इतर शासकीय यंत्रणांनी व्यापक नियोजन केले आहे. भाविकांना सुरळीत आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी ४०० ते ५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुमारे ३०० स्वयंसेवक सेवाकार्यात सहभागी झाले आहेत.
यंदाच्या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथमच एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. ६४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांची संख्या, गर्दीचे व्यवस्थापन, संशयास्पद हालचालींवर लक्ष तसेच गुन्हेगारांची ओळख पटविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे संपूर्ण यात्रेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होत आहे.
मध्यरात्री उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणींचा महाअभिषेक संपन्न झाला. यावेळी खासदार संदीपान भुमरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते.
पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, शिस्तबद्ध रांगेत दर्शन घ्यावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कडेकोट सुरक्षा आणि व्यापक नियोजनामुळे यंदाची आषाढी एकादशी यात्रा सुरक्षित, सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*