गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गंगापूर, दारणा, कडवा आणि भावली या प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने अवघ्या ४८ तासांत सुमारे १० टीएमसी पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने रवाना झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वैजापूर व गंगापूर प्रशासनाने डोणगाव, लाखगंगा, बाजठाण, शनी देवगाव यांच्यासह गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्र, पूल आणि सखल भागांमध्ये जाणे टाळावे, तसेच जनावरे व आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
सध्या जायकवाडी धरणाचा जिवंत पाणीसाठा ३६.२५ टक्के म्हणजेच २७.७९ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे २१ जुलै रोजी हा साठा ३१.०७ टक्के होता. केवळ तीन दिवसांत पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने धरणात पाण्याची आवक किती वेगाने सुरू आहे, याची प्रचिती येत आहे. वरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल ९४ हजार ४९७ क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी सराला बेट परिसराला भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि भाविकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी निवारा केंद्रे सज्ज ठेवण्यात आली असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*