छत्रपती संभाजीनगर : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसह स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी खुलताबाद तालुक्यातील शेरनापूर येथील प्रसिद्ध मे. शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, Safe Food Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ही कारवाई केली.
अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी यापूर्वी रेस्टॉरंटची तपासणी करून आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या फेरतपासणीतही अनेक गंभीर त्रुटी कायम असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी जनहिताच्या दृष्टीने परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.
तपासणीत स्वयंपाकघरातील दरवाजे व फरशी अपेक्षित निकषांनुसार नसल्याचे तसेच खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नसल्याचे आढळले. त्यामुळे झुरळांसह कीटकांचा वावर होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले. तसेच कच्चे व शिजवलेले अन्न, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची योग्य पद्धतीने स्वतंत्र साठवण व हाताळणी केली जात नसल्याचे आढळले.
अन्न हाताळणीच्या ठिकाणी पाणी साचत होते. ड्रेनेज व्यवस्थेतही आवश्यक सुधारणा नसल्याचे आढळले. खाद्यपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्यांच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. अन्नाच्या संपर्कात येणारे पॅकेजिंग मटेरियल फूड ग्रेड असल्याचे प्रमाणपत्रही सादर करण्यात आले नाही.
याशिवाय साठवणूक क्षेत्रातील कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नव्हती. अन्न हाताळणारे कर्मचारी अप्रन, हातमोजे, शिरोवस्त्र आणि शू कव्हर यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने वापरत नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित परवान्याअंतर्गत कोणत्याही अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ढाब्यावर नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचनाही अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*