छत्रपती संभाजीनगर : रिक्षातून प्रवास करताना चुकून विसरलेली अडीच तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स शहर पोलिसांच्या तांत्रिक कौशल्यामुळे अवघ्या काही तासांत संबंधित महिलेला परत मिळाली. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह रिक्षावरील जुन्या ई-चलानच्या पावतीचा आधार घेत पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. या कामगिरीबद्दल शहर पोलिसांच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमधील (सीसीसी) कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

बायजीपुरा परिसरातील तहसीन आसिफ शेख या ७ सप्टेंबर रोजी रिक्षाने प्रवास करत असताना त्यांची अडीच तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स रिक्षातच राहिली. घरी गेल्यानंतर पर्स गहाळ झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने जिन्सी पोलीस ठाणे गाठले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पोलीस आयुक्तालयातील सीसीसी विभागाकडे पाठवण्यात आले.

सीसीसी विभागातील महिला पोलीस अंमलदार वर्षा गोडबोले, मंदा तारू आणि उषा काळे यांनी परिसरातील स्मार्ट सिटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यास सुरुवात केली. अनेक कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासत अखेर संबंधित रिक्षाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला.

मात्र, रिक्षाचा क्रमांक मिळाल्यानंतरही ऑनलाइन यंत्रणेतून रिक्षामालकाचा मोबाईल क्रमांक उपलब्ध होत नव्हता. यावेळी पोलीस अंमलदार चेतन गारदे यांनी वेगळी शक्कल लढवली. त्यांनी संबंधित रिक्षावर यापूर्वी झालेल्या दंडाची ई-चलान पावती शोधली. या पावतीवरून रिक्षामालकाचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता पोलिसांना मिळाला.

यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाशी संपर्क साधला. पोलिसांचा फोन येताच रिक्षाचालकाने पर्स स्वतःकडे असल्याचे सांगत ती घेऊन पोलीस आयुक्तालय गाठले. त्याने पर्समधील कोणतीही वस्तू न काढता ती जशीच्या तशी पोलिसांच्या हवाली केली.

अशाप्रकारे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि ई-चलानच्या मदतीने पोलिसांनी काही तासांतच पर्सचा शोध घेतला. अडीच तोळे सोन्याचे दागिने सुरक्षित परत मिळाल्याने तहसीन शेख यांनी शहर पोलिसांचे आभार मानले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

876 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क