छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला असून नारेगाव परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात आयशा सय्यद (वय ४, रा. नारेगाव) हिच्या शरीरावर ५० पेक्षा अधिक ठिकाणी चावा व ओरखडे लागले असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
रमजान महिन्यानिमित्त सहरसाठी कुटुंबीय पहाटे उठले होते. आयशा घराच्या दारात उभी असताना अचानक पाच ते सहा मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. कोणाला काही समजण्याच्या आत कुत्र्यांनी तिला घरापासून दूर ओढत नेले आणि शरीरावर ठिकठिकाणी चावा घेत रक्तबंबाळ केले. मुलीचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व तिची सुटका केली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले.
बालरोग विभागाच्या युनिट क्रमांक ४ मध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्येक जखमेवर रेबीज प्रतिबंधक ‘एआरएस’ लस देण्यात आली असून ‘एआरव्ही’ लसीकरणही करण्यात आले आहे. तसेच सलाईन व अँटिबायोटिक्स देण्यात आले आहेत. बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उबेद रहमान, डॉ. अनिकेत सरवदे यांनी उपचार केले.
घटनेची माहिती मिळताच महापौर समीर राजूरकर यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली. मनपाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख यांनी नारेगाव परिसरातील चार मोकाट कुत्रे पकडण्यात आल्याची माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*