छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुयोग अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल ५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २५) दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. सलग दुसऱ्या दिवशी वेदांतनगर ठाण्याच्या हद्दीतच दिवसा घरफोडीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मीकांत भास्करराव पाचपोर (वय ६०) हे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातून २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले असून, मुलाला भेटण्यासाठी पुण्यास गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट वाकवून ३ तोळ्यांचे कंठी मंगळसूत्र, विविध वजनाचे सोन्याचे दागिने, २१ ग्रॅम चांदीचे देव, ५० ग्रॅमचा चांदीचा पेला तसेच ३८ हजार रुपये रोख असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.

रात्री साडेआठच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या दीपाली देशपांडे यांनी पाचपोर यांना फोन करून चोरीची माहिती दिली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी देशपांडे यांच्या घरातही हातसाफ करत इमिटेशन दागिने, चांदीची साखळी आणि ४५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. दोन्ही घरांमधून एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक नामदेव सुपे अधिक तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

348 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क