पैठण : श्रीक्षेत्र पैठण येथील नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात आध्यात्मिक वातावरणाची तयारी सुरू झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे. यात्राकाळात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला वारकरी समजून भाविकांची सेवा करावी, असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. पैठण तहसील कार्यालयात गुरुवारी (दि. २६) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
नाथषष्ठी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो वारकरी आणि भाविक पैठणमध्ये दाखल होतात. या पार्श्वभूमीवर नगर परिषद, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, पोलिस प्रशासन आणि इतर यंत्रणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भाविकांना सेवा-सुविधा पुरविताना अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता आणि समन्वय राखून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पंचायत समितीने विशेष नियोजन करावे. नगर परिषदेने शहर स्वच्छतेसह नियमित पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करावे. शहरात डिजिटल होर्डिंग्ज लावण्यास बंदी घालावी, तसेच रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने वारकऱ्यांच्या मार्गांवरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी आणि सुरू असलेली कामे यात्राकाळात बंद ठेवावीत, असेही स्पष्ट करण्यात आले.
विद्युत महामंडळाने यात्रेच्या तीन दिवसांत २४ तास अखंड वीजपुरवठा करावा. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस विभागाने दक्षता घ्यावी. तसेच यात्राकाळात तीन दिवस दारूविक्री बंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीस महसूल, पोलिस, नगर परिषद, महावितरण, एस.टी. महामंडळ, आरोग्य विभाग तसेच जायकवाडी धरण प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरणात नाथषष्ठी यात्रा पार पाडण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*