छत्रपती संभाजीनगर : शहरातील तब्बल २ लाख ८६ हजार ५०० मालमत्ताधारकांना सातबाऱ्याऐवजी पीआर कार्ड देण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली असून, या योजनेला मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. भूमी अभिलेख विभागामार्फत हे काम करण्यात येणार असून, यासाठी सुमारे ६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) मार्फत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
सभेत या विषयावर चर्चा करताना नगरसेवकांनी नागरिकांना दिलासा देणारी ही योजना असली तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी किंवा गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी केली. नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी सांगितले की, शहराच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे पाऊल असून, वाढीव क्षेत्रातील १८ गावांमधील अनेक मालमत्ता गुंठेवारी स्वरूपातील आहेत. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांची नावे सातबाऱ्यावर नोंदवून त्यानंतर पीआर कार्ड देण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरची निवड करण्यात आल्याचे सांगितले. गावठाण व इतर भागांतील आवश्यक चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पीआर कार्ड वितरित करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महापौर समीर राजूरकर यांनी या ठरावाला मंजुरी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*