छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात तब्बल आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सायंकाळी पावसाने दमदार पुनरागमन केले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वाढलेला उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह तसेच जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये काही वेळातच पाणी साचले. प्रमुख रस्ते, चौक आणि सखल भागांमध्ये पाण्याचा साठा झाल्याने वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अनेक वाहनचालकांना पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीदेखील दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, मका आणि इतर पिकांसाठी पावसाची नितांत गरज होती. बुधवारी झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील ओढे, नाले, शेततळी आणि पाणवठ्यांमध्ये पाण्याची आवक वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*