छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन प्रा. लि. यांच्या वतीने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार शहराला ३५ वातानुकूलित (एसी) ई-बसेस मिळणार आहेत. या बसेसच्या पुरवठ्याबाबत वारंवार तारखा बदलत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. मात्र, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या कडक निर्देशांनंतर कंपनीने जुलैअखेरपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बसेस १५ ऑगस्टपासून शहरवासीयांच्या सेवेत दाखल होणार असून, त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या १०० बसेसपैकी केवळ ७० ते ७५ बसेस रस्त्यावर धावत आहेत. वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता विद्यमान बसेस अपुऱ्या पडत असल्याने अतिरिक्त बससेवेची गरज निर्माण झाली होती.
महापालिकेने ओलेक्ट्रा कंपनीकडून भाडेतत्त्वावर या बसेस चालविण्याचा निर्णय घेतला असून, कंपनीला प्रति किलोमीटर ५९ रुपये देण्यात येणार आहेत. कंपनीने आतापर्यंत एक एसी ई-बस उपलब्ध करून दिली असून ती सध्या शहरवासीयांच्या सेवेत आहे. उर्वरित ३४ बसेस ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत शहराला आणखी १०० ई-बसेस मिळणार आहेत. या बसेससाठी जाधववाडी येथील बस डेपोमध्ये अत्याधुनिक चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. ओलेक्ट्राच्या ३५ आणि पीएम ई-बस योजनेतील १०० बसेस उपलब्ध झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरची बससेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*