छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज चमन परिसरात गर्भवती महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला फळविक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर प्रशासन तातडीने ‘ॲक्शन मोड’वर आले असून गुरुवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात परिसरातील बेकायदेशीर हातगाड्यांवर मोठी कारवाई केली.
रमजान महिन्यानिमित्त शहागंज भागात फळविक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. रस्त्याच्या मध्यभागापर्यंत हातगाड्या लावल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास एका गर्भवती महिलेला काही विक्रेत्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. तिच्यासोबत असलेल्या तरुणाने विरोध केल्यानंतर त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे हा प्रकार शहागंज पोलीस चौकीपासून काही अंतरावरच घडला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप उसळला.
या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी मुख्य आरोपी इम्रानसह सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी या घटनेची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा आयुक्तांना दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल केली.
गुरुवारी सकाळी मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या उपस्थितीत शहागंज चमन परिसरातील सर्व अतिक्रमित हातगाड्या हटवल्या. अनेक महिन्यांपासून रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. चारचाकी तर सोडाच, साधी दुचाकी नेणेही कठीण झाले होते. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील रस्ता मोकळा झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भविष्यातही अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*