पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर देशातील समस्या, विकास, आणि भविष्यातील योजनांवर भाष्य केलं. मोदींनी आपल्या भाषणात घराणेशाही, ‘वन नेशन वन इलेक्शन’ धोरण यासह अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
1. कोरोना काळ आणि लसीकरण: मोदींनी कोरोना महामारीच्या काळातील भारताच्या जलद लसीकरण मोहिमेचा उल्लेख केला. त्यांनी दहशतवादाविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचेही स्मरण करून दिलं, ज्यामुळे देशातील युवकांच्या मनात अभिमान आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
2. वंचित वर्गांसाठी योजनांची अंमलबजावणी: दलित, पीडित, आदिवासी, आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी प्रथामिक गरजा पूर्ण करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केलं आहे. मोदींनी “व्होकल फॉर लोकल” या संकल्पनेचा उल्लेख केला आणि वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजनेवर जोर दिला.
3. जल जीवन मिशन: लाल किल्ल्यावरून मोदींनी जल जीवन मिशन अंतर्गत 12 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवण्याच्या योजनेचा आढावा घेतला.
4. सुधारणा: मोदींनी देशातील 3 लाख विविध संस्थांना दरवर्षी दोन सुधारणा करण्याचं आवाहन केलं. या सुधारणा सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
5. कायद्यातील सुधारणा: लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी दीड हजारपेक्षा अधिक कायदे रद्द केल्याचं मोदींनी नमूद केलं. त्यांनी नवीन न्यायसंहिता आणल्याचा उल्लेख केला ज्यामध्ये न्यायाच्या भावनेला प्राधान्य दिलं आहे.
6. अंतराळ क्षेत्रात सुधारणा: मोदींनी अंतराळ क्षेत्रातील बदलांचा आढावा घेतला. त्यांनी अंतराळ क्षेत्राच्या भविष्यकालीन महत्त्वावर जोर दिला आणि स्टार्टअप्सला दिलेल्या संधींचा उल्लेख केला.
7. महिला स्वावलंबन: गेल्या दहा वर्षांत दहा कोटींहून अधिक महिला स्वयंसहायता गटांमध्ये सहभागी झाल्या आहेत. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत, असे मोदी म्हणाले.
8. युवकांना आवाहन: मोदींनी तरुणांना हळूहळू चालण्याऐवजी भरारी घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन केलं.
9. विकासाची ब्लू प्रिंट: विकासाच्या मार्गावर काम करताना सरकारचा उद्देश राजकारण नाही तर राष्ट्र प्रथम ठेवणे आहे, असं मोदी म्हणाले. त्यांनी बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा आढावा घेतला.
10. घराणेशाहीवर प्रहार: मोदींनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली आणि यासाठी एक लाख तरुण-तरुणींनी पुढे येण्याचं आवाहन केलं. त्यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ धोरण लागू करण्याची गरजही अधोरेखित केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात घराणेशाहीपासून ते विकासाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आणि देशातील जनतेला एकत्रितपणे पुढे जाण्याचं आवाहन केलं.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*