पैशाच्या लोभातून आपल्या नातेवाईकाचे अपहरण करून खंडणीची मागणी करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी संजय राजेंद्र मोरे याला अटक केली आहे.
२१ सप्टेंबर २०२४ रोजी कैलास नामदेव मोरे हे आपल्या घरी कोणालाही काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या वडिलांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दोन दिवसांनंतर, कैलास यांच्या भाच्याला व्हॉट्सअॅपवर ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी करत धमक्या आल्या. संदेशात म्हटले होते, “तुम्ही पैसे दिले नाहीत तर मृतदेह सापडणार नाही.”
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संशयित आरोपी संजय मोरे याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, संजयने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्यामुळे कर्जबाजारी झाल्याचे आणि कर्ज फेडण्यासाठी कैलास यांचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे उघड झाले.
कैलास यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संजयने त्यांच्या शेतात त्यांचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह झुडपांखाली लपवला. त्यानंतर खोटे बोलून तो कुटुंबीयांमध्ये वावरत होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
____________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*