छत्रपती संभाजीनगर : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धवसेनेचे नेते तथा हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
खा. खैरे म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी वालीवध करून अयोध्येत परतण्याचा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हा दिवस हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढली जाते. नुकत्याच पार पडलेल्या हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या बैठकीत अध्यक्षपदी राजू वैद्य यांची निवड झाली आहे.
३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता मिरवणुकीस प्रारंभ
या वर्षीची शोभायात्रा ३० मार्च रोजी दुपारी ३:०० वाजता संस्थान गणपती राजाबाजार येथून सुरू होईल. मिरवणूक शहागज, सराफा, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर शिवमंदिर येथे समाप्त होईल. शोभायात्रेत घोडे, उंट, चित्ररथ, सजीव व निर्जीव देखावे हे आकर्षण असणार आहेत.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रदीप जैस्वाल, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे हे विविध पक्षांचे नेते राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर हिंदू आणि त्यांच्या संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतील, असे खैरे यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस राजू वैद्य, आशुतोष डंक, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*