छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी इतिहास घडवला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर जिल्ह्यात महिलांना आमदारकीचे स्थान मिळाले आहे. शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने संजना जाधव (कन्नड) आणि अनुराधा चव्हाण (फुलंब्री) यांनी यंदाच्या निवडणुकीत विजयी होऊन जिल्ह्याच्या महिला नेतृत्वाला नवा आयाम दिला आहे.
महिलांचा विजय कसा झाला?
कन्नड मतदारसंघात संजना जाधव यांनी दोन मातब्बर प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्यांच्याविरोधात पती हर्षवर्धन जाधव आणि विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत निवडणुकीच्या रिंगणात होते. तरीदेखील संजना जाधव यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून मोठा विजय संपादन केला.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विजय औताडे आणि शिंदे गटातील बंडखोर रमेश पवार यांच्यात चुरस होती. परंतु, चव्हाण यांनी पहिल्याच फेरीत आघाडी घेत ती शेवटपर्यंत राखली आणि विजय साकारला.
तेजस्विनी जाधव यांच्या परंपरेला मिळाली नवसंजीवनी
१९८८ मध्ये कन्नडचे तत्कालीन आमदार रायभान जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव यांना पोटनिवडणुकीत संधी देण्यात आली होती. त्यांनी जिल्ह्याच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळवला. मात्र, १९९० नंतर जिल्ह्यात महिला आमदार होण्याचा मार्ग बंद झाला होता.
आता ३० वर्षांनंतर संजना जाधव आणि अनुराधा चव्हाण यांच्या विजयामुळे जिल्ह्यात महिला नेतृत्वाचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले आहे. या दोन्ही महिला आमदारांनी ऐतिहासिक विजय साकारत नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*