गजानन राऊत (वाळूज प्रतिनिधी) : तिसगाव येथे जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ रागाने पाहिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर तलवारीने हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दि. १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश कासुरे (वय ३३) हे आपल्या चुलत भावाच्या घराजवळ उभे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक ३००-४०० मीटर पुढे गेल्यानंतर बिरजू तरैयावाले याने जुन्या वादाच्या कारणावरून रागाने त्यांच्याकडे पाहिले. यावरून दोघांत वाद झाला आणि काही वेळातच बिरजू तरैयावाले, आकाश मन्नुलाल तरैयावाले, ओमकार मोहनसिंग सलामपुरे, कुंदन मन्नुलाल तरैयावाले, चंदुलाल मिड्डूलाल तरैयावाले, मन्नुलाल तरैयावाले, ऋतिक तारासिंग तरैयावाले, अमृतसिंग आसाराम तरैयावाले, अभय तारासिंग तरैयावाले, ईश्वरसिंग तरैयावाले व इतर पाच-सहा अनोळखी व्यक्ती तलवारी, चाकू, लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांसह घटनास्थळी आले.
आकाश तरैयावाले याने योगेश कासुरे यांच्यावर तलवारीने छाती व पाठीत वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिरजू तरैयावाले याने लोखंडी रॉडने योगेश यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. योगेशला वाचवण्यासाठी आलेले राजेंद्र कासुरे व नरेंद्र कासुरे यांच्यावरही हल्ला करण्यात आला.
हल्ल्याच्या दरम्यान राहुल कासुरे, सागर कासुरे, कमलेश सलामपुरे, ऋषीकेश सलामपुरे, गोपाल सलामपुरे, व सोमनाथ क्षत्रिय यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या योगेश कासुरेवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
पोलीस उपायुक्तांनी घेतली घटनास्थळी भेट
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी तिसगावला भेट देत नागरिकांची समजूत घालून शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
