छत्रपती संभाजीनगर : “तू माझी लाडकी मुलगी आहेस… मी थकलोय, पण तू आत्मविश्वासाने पुढे जा आणि अधिकारी हो,” अशा भावनिक शब्दांत आपल्या मुलीसाठी चिठ्ठी लिहून ठेवणाऱ्या फायनान्स व्यावसायिकाचा मृतदेह रविवारी मध्यरात्री सूतगिरणी चौकातील इमारतीखाली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ४५ वर्षीय सुमेश सुरेश महाजन (रा. शारदाश्रम कॉलनी) यांचा मृत्यू कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून पडून झाला असण्याची शक्यता असून, आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
महाजन यांचे कार्यालय सम्यक गॅलेरिया या इमारतीत आहे. रविवारी दुपारी जेवण करून ते कार्यालयात गेले. रात्री ९ वाजता त्यांनी मुलीला फोन करून विचारपूस केली. मात्र, रात्री ११ वाजता पत्नीने कॉल केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मध्यरात्री १ च्या सुमारास कुटुंबीय कार्यालयात पोहोचले. गाडी, चाव्या आणि मोबाइल कार्यालयातच सापडले. शोध घेतल्यावर ते गंभीर जखमी अवस्थेत आढळले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनास्थळी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे व त्यांच्या पथकाने भेट दिली. कार्यालयात मुलीसाठी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, हस्ताक्षराची तज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाणार आहे. या मृत्यूमागे नेमकी काय कारणं आहेत, याचा सखोल तपास सुरू असून, पोलिस विविध अंगाने चौकशी करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*