सिल्लोड : तालुक्यातील वांगी गावात एक अत्यंत दुर्दैवी व हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे. केवळ चार दिवसांवर मुलीचे लग्न असताना, वधू पित्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव सर्जेराव भागाजी साळवे (वय ५५) असे असून, ते वांगी येथील रहिवासी व शेतकरी होते. १८ एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते आणि घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. परंतु, या आनंदमय वातावरणात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबासह संपूर्ण गाव हादरला आहे.
या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरची परिस्थिती चांगली असूनही साळवे यांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करत आहेत.
सर्जेराव साळवे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि सून असा परिवार आहे. या धक्कादायक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*