Slug: Brain dead youth’s family donates organs; Heart sent to Mumbai, lungs to Ahmedabad through Green Corridor
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील वांगी गावातील ३७ वर्षीय गोकुळदास बाबूराव कोटुळे यांचा अपघातानंतर जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अखेरचे प्रयत्न केले. परंतु बुधवारी दुपारी त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. एक क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला… पण या दुःखाच्या काळोखातही कोटुळे कुटुंबीयांनी माणुसकीचा दीप प्रज्वलित केला.
पत्नी कोमल, वडील बाबुराव आणि भाऊ दत्तू कोटुळे यांनी धीराने निर्णय घेतला – गोकुळदासचे अवयव दान करून इतरांना जीवनदान द्यायचे. या निर्णयातून सहा जणांना नवसंजीवनी मिळाली.
गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या चमूने तत्काळ तयारी सुरू केली. ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यातून गोकुळदास यांचे हृदय मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलला, यकृत ग्लेनईगल्स रुग्णालयात, फुफ्फुसे अहमदाबादेतील केडिया रुग्णालयात पाठवण्यात आले. एक किडनी गॅलेक्सी व दुसरी एमजीएम रुग्णालयात प्रत्यारोपित झाली. डोळे स्थानिक रुग्णांना उजेड देण्यासाठी देण्यात आले.
या महत्त्वपूर्ण प्रक्रियेमध्ये डॉक्टर वाजिद मोगल, विजय मुंढे, राहुल वहाटुळे, विनोद चावरे, अमोल खांडे, बालाजी बिरादार, अभिमन्यू माकणे, उमेश काकडे, देवेंद्र लोखंडे, सुजाता चांगुळे आणि जयेश टकले यांचे मोलाचे योगदान होते. स्थानिक पोलिसांनीही ग्रीन कॉरिडॉरसाठी अमूल्य सहकार्य केले.
गोकुळदास कोटुळे हे गेले, पण त्यांच्या माणुसकीच्या या अमोल भेटीमुळे सहा कुटुंबीयांना पुन्हा आयुष्य मिळाले. हा त्याग समाजासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरतो आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*