महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णयाला संपूर्ण समर्थन व्यक्त केले. “जो निर्णय मोदीजी आणि शहाजी घेतील, तो आम्हाला मान्य आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी महायुतीच्या एकजुटीवर भर दिला.
कॉमन मॅन म्हणून केले काम
शिंदे म्हणाले, “अडीच वर्षांत मी स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजले नाही. कॉमन मॅन म्हणून मी काम केले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जनतेने मला स्वीकारले, हीच माझ्यासाठी मोठी ओळख आहे.”
124 ऐतिहासिक निर्णय
“महायुती सरकारने मागील अडीच वर्षांत 124 महत्त्वाचे निर्णय घेतले. मागील सरकारच्या काळात राज्य विकासाच्या बाबतीत मागे पडले होते, ते आम्ही पुढे आणले. मोदीजी आणि शाहजींनी नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला प्रोत्साहन दिले,” असे शिंदे म्हणाले.
पुढे शिंदे यांनी सांगितले की, “महाविकास आघाडीने थांबवलेली अनेक कामे आम्ही पुढे नेली. प्रत्येक घटकासाठी काम करताना केंद्र सरकारकडून मोठा पाठिंबा मिळाला. आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्यावर विश्वास ठेवतो. हे सरकार जनतेचे आहे आणि जनतेसाठी काम करणे हीच आमची प्राथमिकता आहे.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “मी नाराज नाही, तसेच माझ्या निर्णयामुळे कुणालाही अडचण येऊ नये, हीच माझी इच्छा आहे. मी मोदीजींना फोनवर सांगितले आहे की, त्यांनी जो काही निर्णय घेतला, तो माझ्यासाठी अंतिम असेल. महायुतीचे सरकार अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही भाजपसोबत एकदिलाने काम करू.”
राजकीय सस्पेन्स कायम
एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार, याबाबतचा सस्पेन्स अधिकच गडद झाला आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, तर शिवसेना शिंदे गट त्यांच्याच नेतृत्वाला प्राधान्य देण्याची मागणी करत आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक बदल होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*