Oplus_131072

रजापूर (ता. पैठण) शिवारात मंगळवारी (दि. १७) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खेळता-खेळता दोन सख्ख्या भावंडांनी आपला जीव गमावला. विनाकठड्याच्या विहिरीत पडल्याने प्रणव कृष्णा फणसे (वय ६) आणि जय कृष्णा फणसे (वय ९, रा. आडूळ बुद्रूक) या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रणव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत तर जय चौथीत शिकत होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आडूळ बुद्रूक येथील कृष्णा विठ्ठल फणसे यांच्या दोन एकर शेतीत ही घटना घडली. मंगळवारी सकाळी पत्नी वर्षा फणसे यांनी मुलांसह शेतात जाताना त्यांना झाडाखाली खेळण्यासाठी सोडले. त्या तुरीच्या पेट्या गोळा करण्यासाठी गेल्या असताना खेळता-खेळता दोन्ही मुले विहिरीजवळ गेली. यावेळी त्यांचा तोल जाऊन ती ५० फूट खोल विहिरीत पडली.

मुलं झाडाखाली दिसत नसल्याने वर्षा यांनी घाबरून विहिरीकडे धाव घेतली. तिला प्रणव पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी येऊन प्रणवला विहिरीबाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

जयचा मृतदेह विहिरीच्या गाळात अडकला होता. दुपारी ३ वाजता पाचोड पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे इंचार्ज विनायक कदम, फायरमन रितेश कसुरे आणि छगन सलामबाद यांनी प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला.

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आडूळ बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. पाचोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

विनाकठड्याच्या विहिरींवर प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेमुळे कठड्याविना असलेल्या विहिरींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “विहिरींना कठडे नसल्यामुळे अशा घटना टाळता येत नाहीत. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ही दुर्दैवी घटना कुटुंबीयांसाठी काळजाला चटका लावणारी ठरली असून, गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

530 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क