विजय शेजुळ प्रतिनिधी / सिल्लोड: भराडी येथे स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या बसने मंगळवारी आमठाणा येथील भराडी रोडवर अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगा आगीत पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत.
मंगळवारी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी निघालेली बस भराडी रोडवर पोहोचताच अचानक तिच्या इंजिनच्या भागातून धूर येऊ लागला. काही वेळातच बसने पेट घेतला. बसमधील चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि विद्यार्थ्यांना तत्काळ बाहेर काढले.
आगीचा धूर पाहून स्थानिक लोक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळेत आग भडकल्याने विद्यार्थ्यांच्या बॅगा मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
या घटनेने शाळेच्या बसेसची सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. नियमित देखभाल आणि अग्निशमन यंत्रणा तपासली जात नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याची चर्चा होत आहे.
संबंधित घटनेचा तपास सुरू असून प्रशासनाने शाळा आणि वाहन मालकांना सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “विद्यार्थ्यांचा जीव वाचला हे सुदैव म्हणावे लागेल, मात्र यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे,” असे प्रशासनाने सांगितले.
या घटनेने पालकांमध्ये संताप व्यक्त केला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*