छत्रपती संभाजीनगर : सेव्हन हिल उड्डाणपुलावर आज रात्री साडेआठच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या चार चारचाकी आणि एका दुचाकीने एकमेकांना धडक दिली. या साखळी अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून, इतर कोणालाही गंभीर इजा झाली नाही.
अपघात उच्च न्यायालयाकडून आकाशवाणीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर चढणीच्या ठिकाणी घडला. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली.
पुंडलिक नगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहनधारकांना वाहनांसह पोलिस स्टेशनला येण्याचा आदेश दिला. मात्र, वाहनधारकांनी आपसातील वाद घटनास्थळीच मिटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिसांनी वाहने पुलाखाली हलवून वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य दिले.
दरम्यान, या घटनेदरम्यान पुलाच्या दुसऱ्या बाजूसही एका चारचाकी वाहनाने दुचाकीला हूल दिल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहनांच्या आणि नागरिकांच्या मोठ्या गर्दीने गोंधळ उडाला होता.
पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक काही वेळातच सुरळीत करण्यात आली. यानंतर वाहनचालकांनी पुलावरील वाहतुकीत अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://whatsapp.com/channel/0029Va4nqKP3AzNK9P9Kza1a
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*