छत्रपती संभाजीनगर: दहा रुपयांच्या नोटा पडल्याचे सांगून चोरांनी ठेकेदाराच्या गाडीतून ३ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. ही घटना २६ डिसेंबर रोजी कोकणवाडी येथील मंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशी घडली घटना?
किशोर सावंत (वय २७) हे ठेकेदार राजू राजपूत यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत आहेत. २६ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता, किशोर सावंत मंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर गाडीत एकटेच बसले होते. यावेळी एका व्यक्तीने गाडीची काच ठोठावून “तुमचे पैसे खाली पडले आहेत” असे सांगितले. किशोर यांनी गाडीच्या बाहेर पाहिले असता दहा रुपयांच्या नोटा जमिनीवर पडलेल्या दिसल्या.
किशोर नोटा उचलत असताना, दुसऱ्या चोरट्याने क्षणाचाही विलंब न लावता गाडीचा दुसरा दरवाजा उघडला आणि ३ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली.
दोन्ही चोरटे रिक्षाने आले होते. बॅग पळवल्यानंतर ते क्रांती चौक मार्गे पैठण गेटच्या दिशेने पसार झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही घटना उघड झाली. विशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली असतानाही कोणीही काहीही लक्षात घेतले नाही.
पोलिस तपास सुरू
वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बनावटगिरीला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*