छत्रपती संभाजीनगर: सिडको एन-४ भागात भाजीपाला घेऊन घरी निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून पळ काढणाऱ्या बुलेटस्वार दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक केली. ही घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
फिर्यादी लताबाई ज्ञानेश्वर शिरसाट (६०, रा. समृद्धी नगर, सिडको एन-४) या भाजीपाला घेऊन घरी परतत असताना समृद्धी रेसिडेन्सीच्या कॉर्नरजवळ विना नंबरच्या बुलेटवर आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.
अंकुश संतोष राठोड (२३, रा. मूळ जिंतूर, सध्या मुकुंदवाडी) व निखिल नयबराव चव्हाण (२२, रा. मंठा, जि. जालना, सध्या गारखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सोन्याची पोत हस्तगत केली असून आरोपींनी दुसऱ्या गुन्ह्यासाठी कपडे व दुचाकी बदलल्याचे निष्पन्न झाले आहे.
राठोड वाहन पुसण्याचे, तर चव्हाण फरशी बसविण्याचे काम करतो. दोघांकडे महागड्या दुचाकी असून ते आधीही चेन स्नॅचिंगप्रकरणी संशयित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अटकेमुळे दुसरी चेन स्नॅचिंगची घटना टळली. अधिक तपास पुंडलिकनगर पोलीस करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*