छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिसन लड्डा यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या दरोड्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा सोमवारी मध्यरात्री पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला.
या हाय प्रोफाइल दरोड्यात तब्बल साडेपाच किलो सोनं आणि ३२ किलो चांदी असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. दरोडेखोरांनी लड्डा यांच्या घरातील चालक व केअरटेकर यांना बांधून ठेवत बंदुकीचा धाक दाखवून ही धाडसी चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, खोतकर हा एकमेव फरार आरोपी होता.
गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांचं पथक वडगाव कोल्हाटी मध्ये पोहोचलं. आरोपी अमोल खोतकरला अटक करण्याचा प्रयत्न चालू असताना त्याने पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. यानंतर खोतकरने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार करत त्याचा एन्काऊंटर केला.
पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणावर विविध स्तरांवर चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे पालकमंत्री यांनी या दरोड्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे आरोपी खोतकरच्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, खोतकरच्याच ताब्यात चोरीचा संपूर्ण ऐवज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांचा तपास आणि पुढील कारवाईकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*