छत्रपती संभाजीनगर: दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी यंदा माध्यमिक शिक्षण विभागाने विशेष योजना आखली आहे. बोर्डाच्या आदेशानुसार, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत. तसेच, केंद्रांवरील हालचालींचे व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य
शाळांमध्ये सीसीटीव्ही असल्याशिवाय त्या शाळांना परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली जाणार नाही. परीक्षेदरम्यान झालेल्या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद होतील. याशिवाय लाइट गेल्यास जनरेटरची व्यवस्था करणे बंधनकारक असेल.
परीक्षा केंद्रांवर विशेष तपासणी
प्रत्येक केंद्रावर पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा तपासल्या जातील. परीक्षा केंद्राच्या सभोवतालचा परिसरही सुरक्षित आणि नियमांनुसार असल्याची खात्री केली जात आहे.
नियंत्रण कक्षाची स्थापना
शिक्षण विभागात विशेष वॉररूम तयार करण्यात आली असून, प्रत्येक परीक्षा केंद्राच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. केंद्रावरील चाचणी निरीक्षक मोबाईलद्वारे तपशील देणार असून कोणत्याही प्रकारचा संशयास्पद प्रकार घडल्यास तात्काळ कारवाई होणार आहे.
फुटेज जतन करण्याचे आदेश
परीक्षा केंद्रावर रेकॉर्ड केलेले सीसीटीव्ही फुटेज परीक्षा संपल्यानंतर निकाल लागेपर्यंत जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. पूर्वी फक्त लेखी स्वरूपात हमी दिली जात होती, मात्र यंदा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे.
कॉपीमुक्त परीक्षा: शिक्षण विभाग कटिबद्ध
गेल्या काही वर्षांपासून परीक्षांदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांमुळे शिक्षण विभागाला कठोर पावले उचलावी लागली आहेत. यंदा सर्व स्तरांवर कडक तपासणी आणि नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*