कोरोनानंतर आता चीनमध्ये प्रचंड प्रभाव पाडणारा ‘ह्यूमन मेटापन्युमोव्हायरस’ म्हणजे ‘एचएमपीव्ही’ विषाणू भारतातही शिरला आहे. हा विषाणू हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात अधिक प्रमाणात आढळतो. हा श्वसनाशी संबंधित हंगामी आजार असून, सर्दी, खोकला आणि फ्लूप्रमाणे त्याचे लक्षणे आहेत.
कर्नाटकमध्ये रुग्ण आढळल्याने सावधानता वाढली
कर्नाटकमध्ये या विषाणूचे काही रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून महापालिकेने संशयित रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. सर्दी, खोकला आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे.
महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले की, “सध्या राज्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून आरटीपीसीआर चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.” मंगळवारपासून ३९ आरोग्य केंद्रांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.
खबरदारीची उपाययोजना
आरोग्य विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत:
- खोकला आणि शिंका येत असतील, तर तोंड आणि नाक झाकावे.
- साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात वारंवार धुवावेत.
- गर्दीत जाणे टाळावे.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.
- हस्तांदोलन आणि एकाच रुमालाचा वारंवार वापर टाळा.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये.
आरोग्य यंत्रणा सतर्क
कोरोनासारख्या महामारीला समर्थपणे तोंड दिल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्दी-खोकल्याचे नियमित सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खाजगी रुग्णालयांना देखील रोज अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*