छत्रपती संभाजीनगर: “जन गण मन…” हे राष्ट्रगीत बदलून “वंदे मातरम्” राष्ट्रगीत व्हावे, अशी मागणी सरालाबेट येथील रामगिरी महाराजांनी केली आहे. “जन गण मन…” हे गीत १९११ साली ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम यांना खुश करण्यासाठी गायले गेले होते, असा दावा त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगरात “मिशन अयोध्या” चित्रपटाच्या ट्रेलरच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर रामगिरी महाराज म्हणाले, “जेव्हा देश स्वतंत्र नव्हता, तेव्हा हे गीत जॉर्ज पंचमचा उदो उदो करण्यासाठी सादर झाले होते. खरे पाहता, राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ असावे. अयोध्येच्या लढाईप्रमाणे आता राष्ट्रगीतासाठीही संघर्ष करावा लागेल.”
सनातन धर्मावर अन्यायाचा आरोप
रामगिरी महाराजांनी चित्रपटसृष्टीवरही टीका केली. “पूर्वीच्या चित्रपटांतून सनातन धर्म आणि हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. साधू-संतांना विकृत पद्धतीने दाखवले गेले. मौलाना किंवा फादरबाबत असे काहीही दाखवण्याची हिंमत कोणी दाखवली नाही,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “सनातन धर्म हा सहनशील आणि श्रेष्ठ असल्याचा गैरफायदा घेतला गेला. मात्र, आता समाज जागृत झाला आहे. रामायण, महाभारत, गीता यांचे तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी महत्त्वाचे आहे. समाजासमोर योग्य चित्रपट येत असल्यामुळे पुढच्या पिढीवर त्याचा चांगला परिणाम होईल.”
राम मंदिर लढ्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “५०० वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर उभे राहिले आहे. हिंदू एकत्र आल्यावर काय घडू शकते, याचे हे उदाहरण आहे. आता अन्याय आणि अत्याचाराविरोधात हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे.”
रामगिरी महाराजांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*