छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या वतीने बुधवारी आयोजित सभेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस यांच्यावर जातीविषयक राजकारणाचा आरोप करत त्यांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.
हाके म्हणाले, “मी संतोष देशमुख यांच्या हत्येचे समर्थन करत नाही. पण आम्हाला आमचे हक्क मिळवून देणारी माणसं हवीत. मात्र, सुरेश धस हे एका समाजाविरोधात गरळ ओकत आहेत. ते जाणीवपूर्वक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
सर्वपक्षीय संबंधांवर भाष्य
हाके यांनी स्पष्ट केले की, “वाल्मिक अण्णांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. त्यांच्या फोटोचे राजकारण का? निवडणुकीच्या काळात त्यांचा उपयोग करायचा आणि नंतर त्यांना लक्ष्य करायचे, हे अन्यायकारक आहे. ओबीसी नेत्यांना सातत्याने टार्गेट केले जात आहे.”
गुन्हेगारीवरून सरकारवर प्रश्नचिन्ह
हाके यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केले. “सीआयडीच्या पथकातील अधिकाऱ्यांना जात पाहून बाहेर काढले जात आहे. मग आम्हीदेखील तपासाला विरोध करायचा का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारच्या भूमिकेवर टीका
हाके पुढे म्हणाले, “अंतरवाली सराटीत गोळीबार झाला, ओबीसींच्या घरांवर हल्ले झाले, पण याकडे सुरेश धस यांनी डोळेझाक केली. आज तेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारण करत आहेत. ओबीसी समाजाला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे.”
शरद पवारांवरही निशाणा
हाके यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही लक्ष्य करतांना म्हंटले की, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, पुण्यात दर दोन दिवसांनी कोयता गँगकडून हत्या होते. आज पुण्यात इंजिनियर तरुणीची हत्या झाली. स्वतःच्या जिल्ह्यात मुळशी पॅटर्न होतो. त्या जिल्ह्यासाठी शरद पवार कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले नाही, पत्र लिहिले नाही. शरद पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेटायला गेले का? बहुजन समाजातील लोकांनी राजकारण करायचे नाही, यासाठी टार्गेट केले जात असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*