छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेला मोठा धक्का देत माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी ३ जानेवारी रोजी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे उद्धवसेनेत खळबळ उडाली असून, आणखी सात माजी नगरसेवक आणि काही प्रमुख पदाधिकारी शिंदेसेना व भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. बैठकीत खैरे यांनी घोडेले यांच्यावर तीव्र टीका केली आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्ष न सोडण्याची ग्वाही दिली. माजी महापौर त्र्यंबक तुपे, राजू वैद्य, सुदाम सोनवणे, गिरजाराम हळनोर, लक्ष्मण बखरिया आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.
तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शनिवारी सिडको-हडको परिसरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाला मजबूत करण्याचे आवाहन केले.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गळतीची भीती
उद्धवसेनेला जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत यश मिळवता आले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने गळती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत.
नंदकुमार घोडेले यांच्यानंतर काही माजी नगरसेवक शिंदेसेनेत सामील होणार असल्याची चर्चा आहे. ६ जानेवारी रोजी मुंबईत मोठ्या प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारण तापले आहे आणि उद्धवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*