छत्रपती संभाजीनगर : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर खचून न जाता नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या समर्थकांसमवेत राजकीय शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व समर्थकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत आघाडीवर असलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली आहे. “जिथे सत्ता, तिथे मी,” असे ठामपणे सांगणारे सत्तार यांनी यंदाच्या निवडणुकीतही आपली ताकद दाखवत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. मात्र, मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव मागे राहिले.
विशेष म्हणजे, या सत्कार समारंभासाठी लागलेल्या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे फोटो दिसत नाहीत. त्यामुळे सत्तार यांच्या या कार्यक्रमावरून शिंदे गटामधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.
१ जानेवारी रोजी होणाऱ्या या सत्कार समारंभात सत्तार काय भूमिका घेणार, कोणावर आरोपांची तोफ डागणार आणि पुढील राजकीय दिशा काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या कार्यक्रमाला शिंदे गटातील नेत्यांची उपस्थिती राहणार की नाही, यावरूनही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
सत्तार यांच्या या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी राजकीय समीकरणे यावर अवलंबून असतील, असे मानले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*