गंगापुर: दारुच्या व्यसनाने एका मुलाने स्वतःच्या वडिलांचा निर्घृण खून केला. ही घटना वजणापूर शिवारातील गट क्रमांक २८ मध्ये घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वडिलांनी पैसे दिले नाहीत, मुलाचा राग अनावर
५० वर्षीय नंदु शेषराव चव्हाण याने दारु पिण्यासाठी आपल्या वडिलांकडे पैसे मागितले. मात्र वडील शेषराव चव्हाण (८० वर्षे) यांनी पैसे देण्यास नकार दिला. या नकारामुळे संतापलेल्या नंदुने वडिलांना चापट, बुक्क्यांनी आणि लोखंडी खुर्चीने मारहाण केली. या हल्ल्यात शेषराव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेच्या वेळी वडिलांसोबत घरात कोणीही नव्हते. आई व बहीण नातेवाईकांकडे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी, शेषराव यांचा मृतदेह आढळल्यानंतर नातवाने पोलीसांना कळवले.
पोलीसांचा पाठलाग; आरोपी अटकेत
शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी नंदु चव्हाण हा कपाशीच्या शेतात लपण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोकॉ हनुमंत सातपुते यांनी त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली.
दारुच्या व्यसनाने उद्ध्वस्त झालं कुटुंब
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आई व बहिण पैसे पुरवायच्या, पण त्या नसल्यामुळे वडिलांकडे पैसे मागितले. वडिलांच्या नकारामुळे राग अनावर होऊन त्याने खून केल्याचं सांगितलं.या प्रकरणी आरोपी नंदु चव्हाण विरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरात शोककळा
दारुच्या व्यसनामुळे एका कुटुंबाची वाताहत झाल्याने नागरिक संतप्त असून या घटनेने संपूर्ण गाव हळहळत आहे. समाजाने अशा व्यसनांपासून दूर राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*