शहरातील शहागंज परिसरात असलेल्या मोहन टॉकीजजवळील महावीर अलंकार या सोन्याच्या दुकानात ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.१७ वाजता चोरीची घटना घडली. चार बुरखाधारी महिलांनी दुकानातील गप्पांचा फायदा घेत ३६ ग्रॅम वजनाचा, २ लाख ४४ हजार रुपयांचा राणीहार चोरी केला.
दुकानाचे मालक आनंदकुमार संचेती (४३, रा. सावरकरनगर, सिडको) यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीचा प्रकार कसा घडला?
तक्रारीनुसार, दुकानात दोन सेल्समन काम करत होते. या दरम्यान, चार बुरखाधारी महिला सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. दोन महिलांनी प्रत्येक सेल्समनकडे वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची विचारपूस सुरू केली. त्यांनी गप्पांचा माहोल तयार करत एक राणीहार पाहण्यासाठी घेतला.
यातील एका महिलेनं राणीहार घालून पाहण्याचा बहाणा केला, तर दुसरी महिला ओव्हर डिझाइनचा हार दाखवण्याची मागणी करत होती. त्याच क्षणी राणीहार घालून पाहणाऱ्या महिलेने हार चतुराईने बुरख्यात लपवला. त्यानंतर खरेदीसाठी परत येतो, असे सांगून त्या दुकानाबाहेर पडल्या. दुकान बंद करताना या चोरीचा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरीची खात्री झाली.
तपास सुरू
सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दगडखैर यांच्यासह पोलिस पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. चोरी करणाऱ्या महिलांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर पुरावे तपासले जात आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*