छत्रपती संभाजीनगर : शासनाने बंदी घातलेला प्रतिबंधित गुटखा औद्योगिक परिसरात विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धडक कारवाई केली. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने साजापूर शिवारात सापळा रचून ७२ लाख रुपये किमतीचा गुटखा, वाहन, व इतर साहित्य असा एकूण ९४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत अनिस रफिक शेख (रा. किराडपुरा), मोहम्मद शफिर मोहम्मद सादिक (रा. अमरावती), आणि ताहेर खान सईद खान (रा. बडनेरा, अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. गुरुवारी मध्यरात्री धुळे-सोलापूर महामार्गावरील साजापूर परिसरात पोलीस पथकाने संशयास्पद टेम्पो (एमएच-१३, डीक्यू-८१२४) अडवला. टेम्पोतील चालकाने चौकशीत टेम्पोमध्ये गुटखा असल्याची कबुली दिली.
स्विफ्ट कारमधील संशयितांनाही अटक
टेम्पोच्या मागून येणाऱ्या स्विफ्ट कार (एमएच-२७, एआर-७३५६) मधील मोहम्मद सादिक व ताहेर खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत १४८ गोण्यांमध्ये साठवलेला गुटखा, १८ लाखांचा टेम्पो, ४ लाखांची स्विफ्ट कार, असा एकूण ९४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलीस पथकाची कामगिरी
या धडक कारवाईत पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, तसेच प्रवीण पाथरकर, दिनेश बन, सुरेश कचे, जालिंदर रंधे, विशाल पाटील, समाधान पाटील, योगेश शेळके, किशोर साबळे, शिवनारायण नागरे, बबलू थोरात आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*