छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या तपासाला वेग आला असून, या गुन्ह्यातील आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या आरोपींकडून तब्बल १९ तोळे ४ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये नांदेड येथील वजीराबाद परिसरातील आशिष जयकुमार बाकलीवाल (४२), देगलूर नाका येथील शेख शाहरुख शेख रफिक (३२), बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील शेख अबुजर उर्फ शाहिद (२३) आणि शेख सोहेल शेख मुस्तफा (२६) यांचा समावेश आहे.
दरोड्यानंतर आरोपींनी चोरीच्या सोन्याची विक्री साखळी पद्धतीने करण्याचा कट रचला होता. यामध्ये मुख्य सूत्रधार खोतकर आणि गंगणे यांनी आपल्या ओळखीतील व्यक्तींमार्फत सोने वितळवण्याचे व विकण्याचे काम सुरू केले. यापूर्वीच गंगणेच्या सासऱ्याला आणि पत्नीला पोलिसांनी अटक केली होती.
तपासादरम्यान उघडकीस आले की, खोतकरने गंगणेच्या गावातील शेख सोहेल याच्याकडे २० तोळे सोने सुपूर्द केले होते. सोहेलने ते वितळवून सोन्याची ‘लगड’ तयार केली. ही लगड पुढे शेख शाहिदकडे देण्यात आली आणि विक्रीसाठी ती नांदेडच्या शाहरुखकडे पोहोचवण्यात आली. शेख शाहरुख याने हे सोने नांदेडमधील बाकलीवाल ट्रेडर्सचे मालक आशिष बाकलीवाल याच्याकडे विकले.
या संपूर्ण व्यवहाराचा तपास करत गुन्हे शाखेच्या पथकाने प्रथम पुण्यातून शेख सोहेल यास अटक केली. त्याच्या चौकशीतून उर्वरित आरोपींचा तपशील समोर आला आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*