छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील शेवता येथील शेतकरी नवनाथ पवार यांनी २ एकर फुलकोबीच्या शेतीवर रोटाव्हेटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे. फुलकोबी उत्पादनासाठी सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च करूनही बाजारात केवळ १ ते २ रुपये किलोचा कवडीमोल भाव मिळत असल्याने पवार यांना शेतीचा खर्चसुद्धा परत मिळाला नाही.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. पवार यांनी आपल्या फुलकोबीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोदीपासून बाजारापर्यंत माल पोहोचवण्यासाठीचा वाहतूक खर्चही निघणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतीवरील फुलकोबी नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
“फुलकोबीच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत मिळणारा बाजारभाव तुटपुंजा आहे. यामुळे उधारी व नुकसान सोसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मेहनत आणि वेळ वाया गेल्याचे फार दुःख होत आहे,” असे पवार यांनी सांगितले.
या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि भाजीपाला उत्पादकांची आर्थिक अडचण पुन्हा एकदा समोर आली आहे. सरकारने शेतमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*