नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरातील १८ प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी कडेकोट तपासणी केली. या तपासणीत ५४ मद्यधुंद चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.
शहरात नववर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी भव्य पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दीड हजार पोलिस कर्मचारी रस्त्यावर तैनात करण्यात आले होते. मद्यपी आणि अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले होते.
तीन दिवसांत १७२ जणांवर कारवाई
२७ डिसेंबरपासून वाहतूक पोलिस आणि गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबविली. शहरात गेल्या तीन दिवसांत ८७० वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या १५२ वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्या वाहनांची जप्ती करण्यात आली. संबंधित वाहनचालकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली.
ग्रामीण भागातही कडक कारवाई
ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांनी ३९ ठिकाणी नाकेबंदी करून ५१ मद्यधुंद चालकांवर कारवाई केली. यावेळी ७५९ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून ३ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यावेळी निरीक्षक अमोल देवकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले, हरेश्वर घुगे, विवेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली तपासणी मोहीम राबविण्यात आली. अशा कडक कारवाईमुळे नववर्षाच्या रात्री शहरात अनुचित प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*