छत्रपती संभाजीनगर: नायलॉन मांजाच्या वापराने पुन्हा एकदा गंभीर घटना घडली आहे. गुरुवारी (२ जानेवारी) सायंकाळी आमोद हिल्स न्यू पहाडसिंगपुरा परिसरात नायलॉन मांजाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (घाटी) वरिष्ठ परिचारिका ज्ञानेश्वरी आशिष घोडके यांच्या गळ्यावर गंभीर जखम केली.
घोडके या त्यांच्या मुलीला भरतनाट्यमच्या क्लासला सोडण्यासाठी मोपेडवरून जात असताना अचानक त्यांच्यासमोर नायलॉन मांजा आला आणि त्याने त्यांच्या गळ्यावर ८ ते १० सेंटिमीटरची गंभीर जखम झाली. सध्या त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नायलॉन मांजाचा धोका वाढतोय
संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात तरुण मोठ्या प्रमाणावर पतंग उडवत आहेत. परंतु या पतंगांना नायलॉन मांजा लावल्यामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात शहरात नायलॉन मांजामुळे ६ गंभीर घटना घडल्या असून १० जण जखमी झाले आहेत.
पोलिसांचे प्रयत्न अपयशी
पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात मोहिम राबवून दुकानांची तपासणी केली आणि मांजा जप्त केला होता. मात्र, तरीही शहरात नायलॉन मांजाचा वापर सुरूच आहे. या समस्येवर प्रशासन आणि पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*